पवारांच्या पाठिंब्यामुळे मी खासदार झालो हे धादांत खोटे-प्रकाश आंबेडकर

0
690

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – माझ्या पाठिंब्यामुळे प्रकाश आंबेडकर खासदार झाले असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. ते खोडून काढत हे धादांत खोटे असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी शरद पवार खोटे बोलत आहेत त्यांनी एवढेही खोटे बोलू नये असे म्हटले आहे. मी खासदार झालो तेव्हा माझा समझोता त्यावेळचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्यासोबत झाला होता. शरद पवार यामध्ये कुठेही नव्हते असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मला मुरली देवरा म्हटले होते की शरद पवार यांना भेटायचे आहे. ते राजगृहावर भेटायला आले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नाही असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

या स्पष्टीकरणानंतर त्यांनी राफेल करारावर टीका केली. काँग्रेसच्या काळात राफेल विमानाची किंमत ७१२ कोटी होती, भाजपाने ती १६०० कोटी केली. अचानक एवढी किंमत कशी वाढली? उत्पादन फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स करणार, मात्र हे विमान रेडी टू यूज ठेवण्याची किंमत १ लाख कोटी रुपयांवर जाईल अशी माझी माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी कंपनी एचएएलला हे कंत्राट देण्याऐवजी रिलायन्सला का दिले? सरकारने राफेलची रेडी टू यूज किंमत किती असेल हेही स्पष्ट करायला हवे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

 

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत मात्र त्यांचा पक्ष तसा नाही अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. ज्यावर शरद पवारांनी शुक्रवारी उत्तर दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिथे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते. तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. ते धर्मनिरपेक्ष आहेत असं तेव्हा वाटत होते, आता वाटत नाहीत असेही पवारांनी म्हटले होते.