Maharashtra

पवारसाहेब जो निर्णय घेतील, तो मान्य असेल- खासदार उद्यनराजे

By PCB Author

October 07, 2018

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – साताऱ्यातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छूक आहोत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे खासदार उद्यनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तर इतर पक्षातही आपले मित्र आहेत, असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीला सूचक इशाराही दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील  मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीला उदयनराजे भोसले उपस्थित होते. दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकल्याने या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पोहोचायला त्यांना उशीर झाला.

पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, या बैठकीत मी शरद पवारांचे आशिर्वाद घेतले. लोकसभेसाठी मी इच्छूक आहे. स्थानिक पातळीवरुन मला विरोध नाही. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. दरम्यान, सर्वच पक्षात आपले मित्र असल्याचे सांगून इतर पक्षाची दारेही आपल्याला खुली आहेत असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीत सध्या उदयनराजे विरोधात नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  तर साताऱ्यातून लोकसभेसाठी माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.