Chinchwad

पवनेचे पावित्र्य जपले पाहिजे – विघ्नहरी देव महाराज

By PCB Author

November 23, 2018

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – पवनामाईच्या जलस्पर्शाने पवित्र झालेल्या आणि धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मोरया गोसावी मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सलग १६ वर्ष दिपोत्सव साजरा होतो, हे कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांव्दारे धार्मिक-सांस्कृतिक वारसा नव्या पिढीकडून पुढे चालविण्यास मदत होते. पवना नदीतील पाणी प्रदुषित होत आहे. ते रोखण्यासाठी उपाययोजना करून पावित्र्य जपले पाहिजे. यासाठी शहरातील सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज यांनी व्यक्त केली.

संवेदना प्रतिष्ठान आणि चिंचवड देवस्थान संस्थान यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. २२) सायंकाळी चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मंदिर परिसर ११ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. यावेळी दिपोत्सवाचे संयोजक आणि संवेदना प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नाना थोरात, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे, अंबर चिंचवडे, कैलास गावडे, नारायण लांडगे, ललित थोरात, सुरेश बेंद्र, कल्पना चिंचवडे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना थोरात यांनी केले. सूत्रसंचालन अंबर चिंचवडे यांनी केले. सुरेश भोईर यांनी आभार मानले.