पवनेची पाणीपातळी वाढली; मोरया गोसावी मंदिरात तिसऱ्यांदा पाणी शिरले

0
694

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मावळासह पिंपरी-चिंचवड शहराला  पाणी पुरवठा करणारे पवना धरण या वर्षी  आज (बुधवार) दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले आहे.  धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग   सुरू केला आहे.  त्यामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिंचवडगावांतील मोरया गोसवी मंदिरात यंदा तिसऱ्यांदा पाणी शिरले आहे.

थेरगांवातील पवना नदीवरील केजू बंधारा पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी पूर पाहण्यासाठी नागरिकांनी आज दुपारपासून गर्दी केली आहे. मोरया गोसावी मंदिरात नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवात संततधार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना  सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात तब्बल १०६ मी.मीटर पाऊस  झाला  आहे. त्यामुळे पवना धरण यावर्षी दुसऱ्यांदा  शंभर टक्के भरले आहे.   धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम  आहे.  त्यामुळे धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे.