Pimpri

पवना, इंद्रायणी, मुळा नदी प्रदुषणाबद्दल महापालिकेला एमपीसीबीची नोटीस

By PCB Author

December 07, 2023

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (एमपीसीबी) महापालिकेला नोटीस बजाविली आहे. हरित लवादाच्या निर्देशानुसार संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया न केल्याबद्दल आपल्यावर दंड का करू नये, बँक हमी का जप्त करू नये, असा जाबही विचारण्यात आला. १५ दिवसांमध्ये कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीतील पाण्यावर तवंग येत आहेत. नद्यांच्या प्रदूषणाबाबत कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सूरज बाबर यांनी महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, पर्यावरण विभाग, केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल घेत एमपीसीबीने महापालिकेला प्रदूषणाबाबत नोटीस बजावली आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी, औद्योगिक रसायन मिश्रित पाणी मिसळून नद्या फेसाळत आहेत. पाण्याची गुणवत्ता ढासळत आहे. जलपर्णीही वाढत असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. कोणतीही प्रक्रियाविना सांडपाणी रावेत येथे थेट नदीमध्ये सोडल्याचे, औद्योगिक सांडपाणी तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, रामदरा नाल्यामधून इंद्रायणी नदीमध्ये सोडल्याचे नमूद केले असून, यात नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘एमपीसीबी’ने महापालिका सहशहर अभियंता व यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर पाणी, (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायद्यान्वये खटला का दाखल करू नये, हरित लवादाच्या निर्देशानुसार संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया न केल्याबद्दल दंड का करू नये, त्याचबरोबर महापालिका संमतीपत्रात दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे तुमची बँक हमी का जप्त करू नये, अशीही विचारणा केली आहे.