पल्सर दुचाकी चोरून नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले

0
306

चाकण, दि. २० (पीसीबी) – कंपनीमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने त्याची दुचाकी कंपनीसमोर पार्क केली. पण नजरचुकीने चावी दुचाकीलाच राहिली. त्यावर नजर ठेवून असलेल्या एका चोरट्याने दुचाकी चोरली. दरम्यान रस्त्यातच थांबलेल्या पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आली आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग करून थांबवले. त्यानंतर त्याने दुचाकी चोरून आणल्याचे समोर आले. ही घटना 16 जुलै रोजी सकाळी पावणेदहा वाजता इंडयुरंस कंपनी जवळ घडली.

श्रीनिवास बालाजी गजेलवाड (वय 20, रा. आंबेठाण, ता. खेड. मूळ रा. दरेगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत घडणाऱ्या वाहन चोरीबाबत तपास करताना वाहन चोरी होणारी ठिकाणे आणि चोरीला जाण्याच्या वेळेत पोलीस साध्या वेशात गस्त घालत होते. 16 जुलै रोजी महाळुंगे एमआयडीसी मधील इंडयुरंस कंपनी जवळील चौकात महाळुंगे पोलीस साध्या वेशात संशयित व्यक्तींवर पाळत ठेऊन होते.

सकाळी पावणे दहा वाजता मिंडा कंपनीकडून एक पल्सर दुचाकीस्वार वेगात आला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले. मात्र दुचाकीस्वार वेगात पळून जाऊ लागला. त्यानंतर त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर त्याला गाठून पोलिसांनी थांबवले. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्याच्या मागून सिद्धेश्वर वाघमारे तिथे आले. त्यांनी ती पल्सर दुचाकी त्यांची असल्याचे सांगितले. वाघमारे मिंडा कंपनीत दुचाकीवरून (एम एच 14 / एच झेड 6494) मुलाखतीसाठी आले होते. नजरचुकीने त्यांची चावी दुचाकीलाच राहिली. कंपनीसमोर दुचाकी पार्क करून कंपनीत काही अंतर गेल्यानंतर ही बाब वाघमारे यांच्या लक्षात आली. ते लगेच दुचाकीकडे आले. मात्र त्यांची दुचाकी आरोपी श्रीनिवास चोरून नेत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ त्याचा पाठलाग केला.

श्रीनिवास याची चोरी काही वेळेतच उघडी पडली. पोलिसांनी त्याच्यावर वाहन चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.