‘परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपने प्रोत्साहित केले आणि म्हणून मावळमध्ये संघर्ष झाला’

0
314

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : मावळ घटनेची तुलना लखीमपूर हिंसाचाराशी करणाऱ्या भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. मावळची घटना आणि लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेत जराही साम्य नसल्याचं पवार म्हणाले. मावळमध्ये जे घडलं किंवा शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना जबाबदार सत्ताधारी पक्षाचे नेते किंवा मंत्री जबाबदार नव्हते. त्या घटनेला जबाबदार पोलिस आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तेथे कारवाई केली. मात्र लखीमपूर आणि मावळची तुलना होऊ शकत नाही. मावळ घटनेसंदर्भात त्यावेळेला ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या काही संबंध नव्हता. उलट परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपने प्रोत्साहित केले आणि म्हणून मावळमध्ये संघर्ष झाला असा गंभीर आरोप पवार यांनी भाजपवर केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. गोळीबाराच्या काळात लोकांना भडकवण्याचं काम कोणी केलं हे लोकांच्या लक्षात आलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ९० हजारांच्या फरकाने निवडून आला. जर याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार असता तर पक्षाचा उमेदवार निवडणून आलाच नसता हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.

लखीमपूर खेरीमध्ये शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीने चिरडून ४ ते ५ जणांची हत्या करण्यात आली. त्यात एक पत्रकार होता असं समजलं. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. त्या शेतकऱ्यांपैकी काही लोकांनी सांगितलं की त्या गाडीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव होते. मात्र मागणीला प्रतिसाद यूपी सरकारनं दिला नाही. सुप्रीम कोर्टानं प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर मग कारवाईबाबत भूमिका घेतली गेली. ते नव्हतेच अशी केंद्रीय राज्यमंत्री सांगत होते. मात्र त्यांच्या चिरंजीवाला शेवटी अटक करावी लागली.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या चिरंजीवांना अटक करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणी चौकशी सुरू असून केंद्रीय गृह राज्यमंत्री पदावर अजय मिश्रा यांनी राहणे योग्य नाही. यामुळे जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही आणि हे अतिशय महत्वाचे असल्याचे पवार म्हणाले.