Desh

परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर महिला पत्रकाराकडून लैंगिक शोषणाचा आरोप   

By PCB Author

October 09, 2018

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – बॉलिवूडनंतर आता राजकारणातही “मीटू”  वादळ  धडकले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम जे अकबर यांच्यावर  पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपावर एम.जे. अकबर यांनी आपली  प्रतिक्रिया दिलेली नाही. एम.जे. अकबर सध्या केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून  कार्यरत आहेत.  

एम जे अकबर यांचा पत्रकारिता क्षेत्रात मोठा लौकीक आहे.  याची दखल घेत त्यांच्यावर  परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी  देण्यात आली आहे. त्यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रिया रमानी यांनी या प्रकरणी अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी केवळ आपले दु:ख सांगितलेले नाही. तर पूर्ण कहाणीच सांगितली आहे.

प्रिया रमानी  या पोस्टमध्ये म्हणतात की, एम जे अकबर यांच्यासोबतची माझी कहाणी आहे. कधीही त्यांचे नाव घेतले नाही, कारण त्यांनी ‘काही’ केले नव्हते. अनेक महिलांकडे या शिकाऱ्याच्या असंख्य घृणास्पद कहाण्या आहेत. त्या आता पुढे येतील अशी आशा आहे.