Maharashtra

परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात; खंडणी प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे

By PCB Author

September 27, 2021

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्यासह डीसीपी पराग मणेरे, बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया, व्यापारी सुनील जैन, मनोज घाटकर आणि इतर तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यावर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठजणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त असताना २०१८ मध्ये यूएलसी घोटाळ्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधातील मोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकाच्या पुतण्याने केल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुनील आणि संजय यांना आणखी एका खंडणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती.