Maharashtra

परभणीत एकाच वेळी 900 कोंबड्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूच्या भीतीचं सावट, तपास सुरु

By PCB Author

January 09, 2021

परभणी, दि. ९ (पीसीबी): देशभरात सध्या कोरोनाच थैमान सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झालेली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, परभणीतील मुरुंबा गावात गेल्या दोन दिवसापासून कोंबड्यांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे गावात एकाच खळबळ उडाली आहे परभणीच्या मुरुंबा गावात एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. कोंबड्या अचानक मेल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय.

दरम्यान गावातील मृत कोंबड्यांचे सँम्पल्स पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. तसेच, अहवाल आल्यावरच पुढील खुलासा होईल आणि नेमके कारण समोर येईल, असे जिल्हा पशु वैद्यकिय डॉ.अशोक लोणे यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे. परभणी जिल्ह्यातील मुरंबा गावात कोंबड्याच्या मृत्यूमुळे या परिसरातील कोंबड्या विकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोंबड्याचा मृत्यू होण्याच्या घटना आताही सुरू आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो लोक अडचणीत आले आहेत. आधीच कोरोनामुळे ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येण्याआधीच पुन्हा एकदा ठप्प झाला आहे ..