Maharashtra

परभणीतील वकिलाला न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी एक आठवड्याची कैद

By PCB Author

September 05, 2018

परभणी, दि. ५ (पीसीबी) – न्यायालयाचा अवमान आणि न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी परभणीतील रामचंद्र कांगणे या वकिलाला एक आठवड्याची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २००५ मध्ये परभणीच्या न्यायमूर्ती बिलोलीकर यांच्या कोर्टात बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरु होती. यावेळी आरोपीकडून अॅड रामचंद्र कांगणे तर सरकारी पक्षाकडून अॅड रमेश शर्मा बाजू मांडत होते. प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायमूर्ती बिलोलीकर निकास देत असताना, आरोपीचे वकील रामचंद्र कांगणे यांनी कोर्टात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी कांगणे यांनी कोर्टातील स्टेनोंची वही हवेत भिरकावून माननीय न्यायाधीशांविरोधात बोलायला सुरुवात केली. न्यायालयाचा अवमान करत न्यायमूर्तींना धमकवण्यासही कांगणे यांनी मागेपुढे पाहिले नाही.

माननीय कोर्टाने प्रकरणाची दखल घेऊन कांगणेंविरोधात न्यायालयाचा अवमान आणि धमकावल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात सुनावणीसाठी गेले होते. तब्बल तेरा वर्षानंतर हे प्रकरण निकाली लागले असून, अॅड कांगणे यांत दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना एक आठवड्याची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अॅड रामचंद्र कांगणे यांना लगेच अटक केली असून त्यांची रवनागी औरंगाबाद जेलमध्ये करण्यात आली आहे.