Maharashtra

परप्रांतीयांविरोधातील आंदोलन; राज ठाकरेंना जामीन मंजूर

By PCB Author

December 18, 2018

नाशिक, दि. १८ (पीसीबी) – परप्रांतीयांविरोधात २००८ मध्ये आंदोलन केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी दिवाणी फौजदारी न्यायालयाने आज (मंगळवार)  जामीन मंजूर केला. यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.   

रेल्वे भरती परीक्षेदरम्यान २१ ऑक्टोबर २००८ रोजी मनसेच्या आंदोलनात  कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील साईप्लाझा या हॉटेलवर दगडफेक केली होती. या प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे आणि आणखी ६ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

राज ठाकरे न्यायालयात हजर होत नसल्याने त्यांना वारंवार नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज स्वत: सुनावणीसाठी इगतपुरी न्यायालयात हजर झाले. अखेर न्यायदंडाधिकारी के आय खान यांनी राज ठाकरेंना जामीन मंजूर केला. माजी महापौर अशोक मूर्तडक हे जामीनदार होते.