Maharashtra

परदेशातून आला लग्नाला अन् हळदीला गेला; मला करोना झाला आहे. मी रुग्णालयामध्ये दाखल झालो असा मित्रांना मॕसेज केला

By PCB Author

March 27, 2020

 

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने आधीच ३१ मार्चपर्यंत लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यात आणखीन १४ दिवसांची भर पडली आहे. कांनी घरातच थांबावे असे आवाहन सरकारने केले आहे.

परदेशातून आलेल्यांनी १४ दिवस विलगीकरणामध्ये रहावे असे आवाहन सरकारने केले आहे. यासाठी परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्केही मारले जात आहेत. मात्र शिक्का पुसून सार्वजनिक ठिकाणी भटकत इतरांचा जीव धोक्यात टाकण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार डोंबिवलीमध्ये समोर आला आहे.

डोंबिवलीमधील एका तरुणाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. हा तरुण डोंबिवली पूर्वे भागात राहत असून तो काही दिवसांपूर्वीच तुर्कस्तानवरुन भारतात परत आला आहे. पर्यटनासाठी तुर्कस्तानला गेलेला हा तरुण भारतात दाखल झाल्यानंतर विमानतळावर त्याच्या हातावर क्वाड्रन्टाइनचा शिक्का मारण्यात आला होता. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवस घरात राहण्यास सांगितलं होतं. मात्र हा मुलगा काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभाला आणि हळदी समारंभाला उपस्थित राहिल्याची माहिती आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्याने त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांना मेसेज करुन, ‘मला करोना झाला आहे. मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे,’ अशी माहिती कळवली. या तरुणाच्या गैरजबाबदार वागण्यामुळे महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

मागील काही दिवसांमध्ये हा तरुण डोंबिवलीमधील ज्या ज्या भागांमध्ये जाऊन आला आहे तिथे महापालिकेच्या मार्फत फवारणी केली जात आहे. तसेच हा तरुण राहत असलेल्या आणि तो ज्यांच्या संपर्कात आला आहे अशा लोकांची तपासणी केली जात असल्याची माहिती नगससेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एका अधिकाऱ्याने हे वृत्त खरे असल्याचे म्हटले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अद्याप सहा करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोघेजण पूर्णपणे बरे झाले असले तरी त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १३५ वर पोहोचला आहे. देशामधील करोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव अधिक वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. मंगळवारी मोदींनी घोषणा केल्यानंतर बुधवारपासून देशभऱामध्ये लॉकडाउनला सुरुवात झाली आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत राहणार आहे.