Pune Gramin

‘परत इकडे गाडी आली नाही पाहिजे’ असं म्हणत ‘त्यांनी’ केली वाहनाची तोडफोड

By PCB Author

January 19, 2021

चाकण, दि. 19 (पीसीबी): एका वाहनाला अडवून चालकाला धमकी दिली. तसेच पाच वाहनांची तोडफोड करत ‘पुन्हा इकडे यायचे नाही. अन्यथा हातपाय तोडू, मारून टाकू’ अशी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) भर दिवसा म्हाळुंगे येथे घडला.

रामदास अंबादास बाराटे (वय 35, रा. म्हाळुंगे, ता. खेड ) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सहा ते सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सव्वाएक वाजता फिर्यादी रामदास त्यांचा टेम्पो घेऊन म्हाळुंगे येथील जी ई स्टँम्प कंपनी येथून नाणेकरवाडी येथील मधुबन ट्रेडस्टील प्रा ली या कंपनीत जात होते. जी ई कंपनीसमोर अज्ञात सहा ते सात इसमांनी फिर्यादी यांचा टेम्पो अडवला. त्यांच्या टेम्पोच्या काचा फोडून टेम्पोचे नुकसान केले.

त्यानंतर आरोपींनी आणखी चार वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. ‘परत इकडे यायचे नाही. नाहीतर तुमचे पाय तोडू. तुम्हाला घरी येऊन जिवंत मारून टाकू. परत इकडे गाडी आली नाही पाहिजे’ अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.