पदार्पणात प्रविणची चमकदार कामगिरी

0
411

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) : ऑलिंपिक पदार्पणातच भारताच्या युवा तिरंदाज प्रविण जाधव याने चमकदार कामगिरी करून आपला ठसा उमटवला. पात्रता फेरीत अतानुपेक्षा सर्वाधिक गुण मिळविल्याने आता मिश्र दुहेरीत दीपिकाच्या साथीत अतानुच्या जागी प्रविण जाधवला पसंती मिळाली. पदार्पणाच्या स्पर्धेतच त्याची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद ठरली.

प्रविणप्रमाणेच मिश्र दुहेरी स्पर्धेचेही या वेळी ऑलिंपिकमध्ये पदार्पण होत आहे. शनिवारी ही स्पर्धा होईल. या स्पर्धा प्रकारात भारताला पदकाची सर्वाधिक संधी मानली जात आहे.

प्रविण आणि दीपिका कुमारी यांच्या एकत्रित गुणांनंतर भारताला मिश्र दुहेरीत ९वे स्थान मिळाले. विशेष म्हणजे वैयक्तिक मानांकनातही दीपिका नवव्या स्थानावर आली आहे. भारताने मिश्र दुहेरीसाठी अतानु आणि दीपिका यांची प्रवेशिका पाठवली होती. या दोघांनी ऑलिंपिकपूर्वी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. स्पर्धेच्या नियमानुसार जो पुरुष आणि महिला क्रखमवारीत अव्वल येतो त्यांची जोडी बनवली जाते. भारतीय महासंघाला या निर्णयात बदल करण्याचा अधिकार होता. मात्र, त्यांनी तो केला नाही. त्यांनी प्रविणच्या खेळण्यावर शिक्कामोर्तब केले.

अर्थात, स्पर्धा पेक्षा मानांकन महत्वाचे नसते. कधी कधी अव्वल मानांकित खेळाडू खालच्या मानांकित खेळाडूकडूनही पराभूत होऊ शकतो. बीजिंग २००८ ऑलिंपिक स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडूस मुख्य फेरीत ६४व्या स्थानावर असलेल्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला होता. हा इतिहास असला, तरी मानांकन कुठलेही असले,तरी स्पर्धेच्या दिवशी तुमची जी कामगिरी होते त्याला अधिक महत्व असते.

अशा वेळी मानांकनाचा विचार करण्यापेक्षा त्या लढतीविषयी नियोजन करणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला मार्गात दोन्ही ठिकाणी म्हणजे वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात भारतीय तिरंदाजांना बलाढ्य दक्षिण कोरियाचा अडथळा पार करायचा आहे.

वैयक्तिक प्रकारात भारतीय पुरुषांना चमक दाखवता आली नाही. तरुणदीप राय ६४ तिरंदाजांमध्ये ३७वा आला. त्याचवेळी प्रविणने ६५६ गुणांसह ३१वे स्थान पटकावले. अतानु प्रविणपेक्षा तीन गुण कमी मिळवून ३४व्या स्थानावर आला. पहिलीच स्पर्धा असूनही प्रविणने दडपण ज्या पद्धतीने हाताळले ते सर्वात महत्वाचे ठरले.

असो पुन्हा एकाद स्पष्ट करतो, मानांकन महत्वाचे नाही. स्पर्धेच्या दिवशी तुमची कामगिरी कशी होते यावर सर्वकाही अवलंबून असते. त्यामुळे निराशा नको. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.