पत्रकार राणा अयुब यांना ट्रोलर्सकडून बलात्काराच्या धमक्या; सुप्रिया सुळेंनी घेतली दखल; म्हणाल्या…

0
361

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : पत्रकार आणि लेखिका राणा अयुब यांना गेल्या काही दिवसापासून धमक्या आणि शिवीगाळ करणारे मेसेज येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या ट्विटची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आणि गृहमंत्री आणि पोलिसांनीही या प्रकरणी कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

पत्रकार आणि लेखिका राणा अयुब यांना गेल्या काही दिवसांपासून शिवीगाळ करणारे मेसेजेस, बलात्काराच्या धमक्या सोशल मीडियावरुन येत आहेत. काही ट्रोलर्स त्यांना त्रास देत आहेत. या बद्दल त्यांनी ट्विट करत या ट्रोलर्सच्या मेसेजचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. तसंच याप्रकरणी कोणत्याही राज्याचे पोलीस काही कारवाई करतील का असा प्रश्नही विचारला आहे. त्यांचं हे ट्विट शेअर करत खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, ‘अशा प्रकारच्या सायबर छळाचा निषेध करते. सध्या नेटिझन्सना यामुळे फार त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने याविरोधात पावले उचलायला हवीत. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी.’

त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नवी मुंबई पोलीस आणि गृहमंत्रालयाला टॅग करत या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राणा अयुब यांच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनीही उत्तर दिलं आहे. आम्ही या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांना लक्ष घालायला सांगत आहोत, अशा आशयाचं हे ट्विट आहे. मात्र, आत्तापर्यंत अनेकदा आपण तक्रार केली, पोलिसांनी प्रकरण इतर पोलिसांकडे सोपवलं. पण कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही, अशा प्रकारे ट्विट करत राणा यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

‘गुजरात फाईल्स’ या गुजरात दंगलीवर आधारित असलेल्या पुस्तकामुळे राणा अयुब चांगल्याच वादात सापडल्या आहेत. २०१६ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकामुळे त्यांना अद्याप वादाला सामोरं जावं लागत आहे. याआधीही त्यांना बऱ्याच वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.