पत्रकाराच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहील्याप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा

1391

पुणे, दि. १७ (पीसीबी) –  पत्रकाराच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकऱणी राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन शेख, महादेव बालगुडे, सचिन कुंभार अशी या तिघा कार्यकर्त्यांची नावे आहेत. या प्रकरणी पत्रकार कृष्णा वर्पे यांनी  पोलिसांत  तक्रार दाखल केली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार,  मोहसीन शेख याने काही दिवसांपूर्वी वर्पे यांना फोन करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला  होता. तसेच ऑफिसचा पत्ता विचारुन धमकावले होते. तर महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार याने या पत्रकाराच्या पत्नीविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता.

या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या त्रासाकडे वर्पें यांनी  दुर्लक्ष केले होते. परंतू त्यांच्या पत्नीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्यानंतर  त्यांनी पोलिस  ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, मोहसीन शेख याने अभियांत्रिकीचा डिप्लोमा केला आहे. तो क्रिएटिव्ह आर्टिस्ट  म्हणून काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोहसीन शेखचा ‘राष्ट्रवादीचे शिलेदार’ म्हणून गौरव केला होता.  राष्ट्रवादीच्या या शिलेदाराचा आम्हाला अभिमान आहे, अशी पोस्ट त्यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर केली होती.