पत्नीला नांदायला पाठवण्यासाठी पतीवर १५ लाखांचा दंड, दंड न भरल्याने पती समाजातून बहिष्कृत

0
267

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – जातीतून बहिष्कार टाकण्याच्या प्रथे विरुध्द सरकारने कायदा करूनही आजसुध्दा ही कालबाह्य प्रथा आजही बिनदिक्कतपणे सुरट आहे. पत्नीला नांदायला पाठवण्यासाठी चर्चा करण्याच्या निमित्ताने पतीला माहेरी बोलावून घेतले. त्यानंतर कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने पतीला पंधरा लाखांचा दंड ठोठावला. पतीने हा दंड भरण्यास नकार दिल्याने जातपंचायतीने पतीला कंजारभाट समाजातून बहिष्कृत केले. हा प्रकार 1 फेब्रुवारी 2019 रोजी मोशी मार्केट शेजारी मोशी येथे घडला.

प्रशांत उर्फ विकी गागडे, संगीता गागडे, शुभम गागडे (तिघे रा. आदर्शनगर, मोशी), छोटू गागडे (रा. भाटनगर, पिंपरी), जात पंचायतीचे अध्यक्ष विजय गागडे, पंच गुल्या अबंगे, पंच सूर्यकांत माचरे, पंच शशिकांत गागडे, पंच बबलू तामचीकर, पंच सुभाष माचरे व इतर लोक यांच्या विरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायदा 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण कायदा कलम तीन, चार, पाच, सहा व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुशांत सुनिल नगरकर (वय 26, रा. विक्रमनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांनी शनिवारी (दि. 17) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशांत यांच्या पत्नीला सुशांत यांच्यासोबत नांदायला पाठवायचे किंवा नाही यासंबंधी घरगुती चर्चा करण्यासाठी सुशांत यांना आरोपींनी मोशी येथे बोलावले. त्यानंतर सुशांत यांना काहीही न सांगता जात-पंचायत भरवून फिर्यादी यांना जातपंचायतीने 15 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास कंजारभाट या जातीतून बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली. सुशांत यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने आरोपींनी सुशांत यांना कंजारभाट समाजातून बहिष्कृत केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.