पत्नीला घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या व्यक्तीला कारची धडक; बरगड्या फ्रॅक्चर

0
180

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – रुग्णालयात काम करणा-या पत्नीला घरी नेण्यासाठी आलेल्या पतीला एका कारने जोरात धडक दिली. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला. अपघातात जखमी व्यक्तीच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 25) रात्री सात वाजता जनरल हॉस्पिटल समोर तळेगाव स्टेशन येथे झाला आहे.

ओमप्रकाश कालीचरण वाल्मिकी (वय 58, रा. वराळे, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाल्मिकी यांच्या पत्नी तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटलमध्ये काम करतात. शनिवारी रात्री सात वाजताच्या सुमारास वाल्मिकी त्यांच्या पत्नीला रुग्णालयातून घरी नेण्यासाठी आले होते. मात्र, वाल्मिकी आले त्यावेळी पत्नीची सुट्टी झाली नव्हती. त्यामुळे वाल्मिकी शिवाजी चौकाकडे पायी चालत जात होते.

त्यावेळी एका अनोळखी स्विफ्ट कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. वाल्मिकी रस्त्यावर पडले. त्यांच्या मानेवर, डोक्यात आणि बरगडीवर गंभीर दुखापत झाली. या अपघातात वाल्मिकी यांच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. अपघात घडल्यानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.