Pune Gramin

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तळेगाव मनसे अध्यक्षावर गुन्हा

By PCB Author

July 21, 2020

तळेगाव, दि. २१ (पीसीबी) – माहेरहून लाखो रुपये आणण्याची पत्नीकडे मागणी केली. तसेच मुलगी झाली म्हणून तिचा छळ केला, अशी फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत मनसेचे तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष राहुल राजेंद्र मांजरेकर (वय-३०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह रंजना राजेंद्र मांजरेकर, राजेंद्र लक्ष्मण मांजरेकर, प्राची अमर माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल यांच्या पत्नी सीमा राहुल मांजरेकर (वय-२८) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ डिसेंबर २०१४ ते १८ जुलै २०२० या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. गाडी घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्यांनी सीमा यांच्याकडे केली. सासरच्यांना मुलगा हवा होता, मात्र सीमा यांना मुलगी झाली. या कारणावरून सासरच्या मंडळींनी सीमा यांचा छळ केला. आरोपी पती राहुलचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून देखील आरोपी यांनी सीमा यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे सीमा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पती राहुल मांजरेकर यांनी देखील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सीमा राहुल मांजरेकर, कमल गजानन खांडेभराड, कविता अनिल सातकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी राहुल आणि पत्नी सीमा यांच्यात भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरून सीमा यांची आई आणि बहीण यांनी तिच्या घरी येवून फिर्यादी राहुल यांना लोखंडी गज व लाथाबुक्यांनी गंभीर मारहाण केली. तू माझ्या मुलीला नांदवत नाही काय, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे राहुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.