Maharashtra

पती निधनानंतर मंगळसूत्र, कुंकू, जोडवे काढण्याची गरजच काय …

By PCB Author

May 11, 2022

कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) – शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्याचं कारण हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय… पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात विधवा महिलांना समाजात इतर स्त्रियांप्रमाणे मानसन्मान मिळावा यासाठी हेरवाड गावाने उचलेलं हे पाऊल कौतुकास पात्र आहे.

हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. ग्रामसभेत हा विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव मांडला आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांनी या ठरावाला एकमताने मंजूरी दिली. करमाळा इथल्या महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांच्या प्रेरणेतून हा निर्णय घेतल्याचं सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितलं.प्रमोद झिंजाडे हे राज्य विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे समन्वयक आहेत. “विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी अशा प्रथा बंद करण्याची गरज आहे. शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचे ठराव संमत करून सरकारकडे पाठवावेत,” असंही सरपंच पाटील यांनी म्हटलं.

ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून हा प्रश्न विधानसभेत मांडला जावा यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने हे छोटं पाउल उचलल्याचं पाटील सांगतात. विधानसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा कायदा संमत व्हावा यासाठी इतर गावांमधूनही पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

आई होण्याचं योग्य वय कोणतं? या प्रश्नाचं ठोस उत्तर जाणून घ्या चिमुकलीच्या उपचारासाठी ही आई विकतेय स्वत:चं दूध पतीच्या निधनानंतर महिलांना दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा आजही सूरू आहे. या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढलं जातं, कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, पायातील जोडवी, हातातील बांगड्या तसंच अंगावरील दागिने काढले जातात.

पतीच्या निधनानंतर महिलेचं आयुष्य एकाकी करण्याच्या या प्रथेमुळे विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होता येत नाही. कोणत्याही शुभ कार्यात विधवा महिलांना हीन वागणूक दिली जाते. याच प्रथेच्या विरोधात हेरवाड ग्रामस्थांनी आवाज उठवला. हेरवाड गावातील लोकांनी हा समज झुगारून लावत ग्रामसभेत या प्रथेविरोधात ठराव संमत केला.