Pimpri

पतीसोबत असलेल्या व्यवसायाच्या वादामुळे विवाहितेवर बलात्कार; चिखली आणि चाकण मधून आरोपींना अटक

By PCB Author

October 28, 2018

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – विवाहितेच्या पतीसोबत असलेल्या भंगाराच्या व्यवसायाच्या वादातून दोघा जणांनी एका ३५ वर्षीय विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२७) पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतील एका पडक्या घरात घडली.

याप्रकरणी पीडित ३५ वर्षीय विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सचिन अशोख गावडे, आकाश अनिल जरकर, सद्दाम अब्दुलबारी हुसेन आणि सलमान उर्फ नसीब मुबारकअली (सर्व रा. खेड) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय महिलेच्या पतीसोबत आरोपी सद्दाम आणि सलमान यांचे भंगाराच्या व्यवसायातून भांडण होते. यामुळे आरोपींनी सचिन आणि आकाश या दोघांना विश्वासात घेऊन हा कट रचल्याची प्राथमिक माहिती आहे. सचिन आणि आकाश या दोघांनी पीडितेला नातेवाईकांच्या घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरुन एका पडक्या घरात नेले. तेथे त्यांनी पीडितेला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली असून सचिन, आकाश, सद्दाम आणि सलमान या चौघांवर कलम ३६६, ३७६ (ड) आणि ५०६ अनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चौघांनाही चिखली आणि चाकण परिसरातून अटक करण्यात आली आहे.