पतीने सीमेवर जाऊ नये म्हणून पत्नीने केली आत्महत्या

793

द्वारका, दि. १८ (पीसीबी) – भारतीय लष्कराचा जवान असलेल्या अपल्या पतीने सीमेवर जाऊ नये या कारणावरुन पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१६) देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंबालिया शहरातील योगेश्वर नगरमध्ये घडली.

मीनाक्षी जेठवा (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षीचे पती भूपेंद्रसिंह हे लष्करात आहेत. यांची जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे पोस्टींग आहे. ते नुकतेच सुटीवर घरी आले आहेत. भूपेंद्रसिंह हे जम्मू-काश्मीरमधील हिमवर्षावाशी सामना करून घरी परतले होते. आपले पती हिमवर्षावातून वाचून घरी आल्याचे माहीत झाल्यानंतर भूपेंद्रसिंह यांची पत्नी मीनाक्षी या अतिशय धास्तावलेल्या होत्या. दरम्यानच्या काळात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४४ राष्ट्रीय रायफल्सचे ४० जवान शहीद झाल्याची घटना घडली. त्यानंतर मीनाक्षी यांना भीतीने ग्रासले होते. यामुळे आपल्या पतीने पुन्हा लष्करात जाऊ नये अशी मीनाक्षी यांची इच्छा होती. मीनाक्षी यांनी आपले पती भूपेंद्रसिंह यांना तशी वेळोवेळी विनंती केली होती. मात्र, सुट्टी संपल्यानंतर आता आपल्याला ड्युटीवर जावेच लागेल असे भूपेंद्रसिंह यांनी मीनाक्षी यांना सांगितले.

शनिवारी रात्री, एक कौटुंबिक कार्यक्रम आटोपून भूपेद्रसिंह आणि त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरातील वरची खोली बंद असल्याचे त्यांना आढळले. मीनाक्षी झोपल्या असाव्यात असे सर्वांना वाटले. तिला त्रास देऊ नये असा विचारकरून सर्वजण खालच्या खोलीतच झोपी गेले. रविवारी सकाळी मीनाक्षी खोलीचे दार उघडत नाही हे लक्षात येताच भूपेंद्रसिंह काळजीत पडले. त्यानंतर भूपेंद्रसिंह यांनी बळजबरीने खोलीचे दार उघडले. मात्र, आता मीनाक्षी पंख्याला लटकल्याचे त्यांना आढळले.