Desh

पतंजलीच्या विक्रीत पाच वर्षांत पहिल्यांदाच मोठी घट

By PCB Author

November 22, 2018

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची झोप उडवणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला पाच वर्षांत पहिल्यांदाच मोठा झटका बसला आहे. वस्तू आणि सेवा करी अंमलबजावणी आणि कमकुवत वितरण व्यवस्थेमुळे कंपनीच्या उत्पदनाची विक्री कमी झाली आहे.

‘केअर रेटिंग’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हे वास्तव समोर आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पतंजलीला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात १० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हा महसूल ८,१४८ कोटींपर्यंत खाली घसरला होता. येत्या तीन ते पाच वर्षांत कंपनीची उलाढाल २० हजार कोटींवर नेण्याचा बाबा रामदेव यांचा प्रयत्न होता. २०१२ मध्ये ५०० कोटींपर्यंत मर्यादित असलेला कंपनीचा महसूल २०१६ मध्ये १० हजार कोटींपर्यंत गेला होता.

‘पतंजली’ची स्वत:ची आयुर्वेद चिकित्सालय असल्याने सुरुवातीला त्यांच्या उत्पादनांची लोकप्रियता वेगाने वाढली होती. मात्र, पतंजलीची उत्पादने जनरल स्टोअरमध्ये गेल्यानंतर या लोकप्रियतेला ओहोटी लागली. सर्वसामान्य ग्राहक या उत्पादनांकडे इतर उत्पादनांप्रमाणेच पाहू लागला. त्याचा फटका पतंजलीला बसल्याचे बोलले जात आहे.