” …पण राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला”

0
189

पुणे,दि.२५(पीसीबी) – केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत आणि खासकरुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन करत ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रात शेतीवर इतकं मोठं संकट आलं, पण सरकारचं अस्तित्व कुठेही दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे नुकसान झालं पण शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. ऊस कारखानदारीसंबंधी केंद्राने इतके निर्णय घेतले. ऊसाच्या शेतकऱ्याला एफआरपी मिळाला पाहिजे याासठी ऊस, साखरेचा धंदा स्थिर झाला पाहिजे यासाठी एमएसपीचा निर्णय झाला. गेल्या ४० वर्षांपासून याची तरतूद आहे पण कोणत्याही सरकारने अवलबं केला नाही. मोदी सरकारमुळे साखरेचे भाव स्थिर झाले आणि कारखाने शेतकऱ्याला एफआरपी देऊ शकले. नरेंद्र मोदींनी ही हिंमत दाखवली, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

“केळीच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे नियम या सरकारने बदलल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. या सरकारमध्ये शेतकऱ्यासाठी बोलणारं कोणी नाही. शेतकऱ्यांचा आता विचार केला जात नाही. आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. पण आज कोणी पाहण्यास तयार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांच्या बांधावर गेले होते तेव्हा 50 हजार रुपये हेक्टरी मदत देऊ असं म्हटलं होतं, मात्र आठ हजार दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की बागायत शेतकर्‍यांना दीड लाख रुपये देऊ. पण राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला. प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्याचे काम या सरकारने केले आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली. मोदी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि कायम राहतील असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.