Desh

आता हा खेळ संपला; ‘या’ राज्यात कमळ फुलणार

By PCB Author

March 08, 2021

नवी दिल्ली, दि.८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या परिवर्तन घोषणेवरुन निशाणा साधत तुमच्या पक्षाचा खेळ आता संपला असल्याची टीका केली आहे. कोलकातामध्ये आयोजित रॅलीत बोलताना भाजपाचा विकासाचं राजकारण तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या विरोधात असल्याचं सांगत नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील मतदारांना खरा बदल करण्यात मदत करण्याचं आवाहन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीदरम्यान संबोधित करताना उपस्थितांना तृणमूल काँग्रेस गेल्या १० वर्षांपासून भ्रष्टाचार आणि खंडणीचा खेळ खेळत असल्याचं सांगितलं. “तुम्ही (तृणमूल काँग्रेस) अनुभवी खेळाडू आहात. कोणता खेळ तुम्ही खेळलेला नाही? तुम्ही बंगालच्या गरीबांना लुटलं आहे. केंद्राने वादळाचा फटका बसलेल्यांना पाठवलेली मदतही लुटण्यात आली. बंगालमध्ये ऑलिम्पिक खेळाच्या दर्जाचा भ्रष्टाचार सुरु आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

“पण आता हा खेळ संपला पाहिजे. खेळ थांबवणार आणि विकास होणार….बंगालमध्ये आता कमळ फुलणार आहे,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. “भाजपाचं सरकार आल्यानंतर फक्त पक्ष बदलणार नाही, तर बंगालमध्ये त्याचा निकालही दिसेल. तरुणांकडे शिक्षण आणि रोजगार असेल आणि त्यांना राज्य सोडावं लागणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सकार आल्यानंतर उद्योग, वाणिज्य आणि गुंतवणुकी वाढेल आणि विकास होईल. समाजातील प्रत्येजकण विकासात समान सहभागी असेल,” असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

“स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात बंगालकडून अनेक गोष्टी हिरावून घेण्यात आल्या. हिरावून घेतलेल्या सर्व गोष्टी आम्ही परत देऊ. भाजपा सरकारसोबत पाच वर्षांमध्ये होणारा विकास पुढील २५ वर्षांच्या विकासाची पायाभरणी असेल. कोलकाता भविष्यातील शहर न होण्यामागचं कोणतंही कारण नाही,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. .