Maharashtra

पगार एवढे वाढले आहेत की, एसटी कर्मचारी वेडे झाले आहेत – दिवाकर रावते

By PCB Author

October 11, 2018

औरंगाबाद, दि. ११ (पीसीबी) – एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले आहेत, की ते वेडे झाले आहेत, असे विधान परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना केले. आपण अधिकृतपणे बोलत असल्याचेही ते म्हणाले. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या वतीने औरंगाबादेत शहर बससेवा सुरू केली जाणार आहे.  सध्याच्या पगारातच शहर बससेवाही चालवली जाणार का, असा प्रश्न रावतेंना यावेळी करण्यात आला. त्यावर- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले आहेत, की ते वेडे झाले आहेत. मी हे अधिकृतपणे बोलत आहे, असे रावते म्हणाले.

तोटा भरुन काढण्यासाठी एसटी माल वाहतूक सुरु करणार आहे.एसटीच्या कायद्यात तशी तरतूद असल्याने लवकरच रेल्वे प्रमाणे एसटीतून मालवाहतूक सुरु केली जाणार आहे. दरम्यान, वेतनवाढीच्या मागणीसाठी जून महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अघोषित संप पुकारला होता. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली होती.