Maharashtra

पक्ष काढण्याचा रिकामा उद्योग कशाला करता ? शिवसेना आमदार जाधवांना पत्नीचा सवाल

By PCB Author

September 19, 2018

औरंगाबाद, दि. १९ (पीसीबी) – शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परंतु पक्ष काढण्याच्या निर्णयाला खुद्द् त्यांच्या सौभाग्यवतींनी विरोध केला आहे. पक्ष काढण्याचा रिकामा उद्योग कशाला करता ? यावरून बायकोचेही बोलणे खावे लागत आहे. पण मी ऐकणार नाही म्हटल्यावर तिनेही ‘तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगून टाकले आहे, असे जाधव यांनी सांगितले.    

नवा पक्ष  काढण्याच्या निर्णयावरून  माझी बायको आणि माझे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष   रावसाहेब दानवे मला वैतागले आहेत. मी आमदार किंवा खासदार होण्यासाठी पक्षाची स्थापन करत नाही. मात्र, आपल्याला त्यांच्या सोबत जायचे नाही. हा ऐकतच नाही म्हणत माझे सासरे डोक्‍याला हात मारून घेतात,  असे आमदार जाधव यांनी सांगितले.

जाधव यांनी नवा राजकीय पक्ष काढण्यास सासरे दानवे आणि पत्नीने तीव्र विरोध  केला आहे.  याबाबात बोलताना आमदार जाधव म्हणाले की, राजकीय पक्ष काढणे सोपे काम नाही. याची मला जाणीव आहे. लोक मला वेड्यात काढतात, पक्ष चालवायला पैसा लागतो, माणसे लागतात हे खरे आहे. मी पैसा कमावला नसला तरी माणसे खूप कमावली आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठिंब्यावर यशस्वी होणारच, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.