पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा  

0
1063

लोणी काळभोर दि. १४ (पीसीबी) –  शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातून  माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडून या दोघांपैकी एकालाच उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. त्यामुळे या दोघासह उमेदवारीवरुन पक्षाबरोबर कोणीही गद्दारी किंवा गडबड  केल्यास  त्यांना माझ्या दारात उभे करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला.

कुंजीरवाडी (ता. हवेली)  येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, शिरूर- हवेलीच्या विद्यमान आमदाराच्या कार्यपद्धतीमुळे येथील आमदार राष्ट्रवादीचाच होणार याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र, उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय शरद पवार घेणार आहेत. पवार आणि कंद यापैकी एकाने लोकसभा किंवा विधानसभा लढवावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र दोघेही आमदारकी लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे याबाबत आता पवारसाहेबच  निर्णय  घेतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.