Desh

पक्षाचे नेतृत्व करण्यावरून करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये धुसफूस

By PCB Author

August 13, 2018

चेन्नई, दि. १३ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर आता  पक्षाचे  नेतृत्व कोणी करायचे यावरून  करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. मोठा मुलगा एम. अळगिरी यांनी आपणच करुणानिधींचे खरे राजकीय वारसदार आहोत, असा दावा केला आहे. त्यामुळे धाकटा मुलगा स्टॅलिन च्या नेतृत्वावर प्रश्चचिन्ह उभे राहिले आहे.

एम.अळगिरी , एम स्टॅलिन आणि कनिमोळी ही करुणानिधींची तीन मुले आहेत. अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून राजकीय नेतृत्वावरून वाद  सुरू आहे. या दोघांमधील वादांमुळेच काही वर्षांपूर्वी अळगिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचवेळी स्टॅलिन यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपदही दिले होते. या दोघांमधील वादामुळे २०११ आणि २०१६ रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम( द्रमुक)ला पराभव  झाला होता. अळगिरी यांची पक्षातून हकालपट्टी   केल्यानंतर  हा वाद शमला  होता. अळगिरी बरीच वर्षे  राजकारणापासून  अलिप्त होते.

मात्र, करुणानिधींच्या निधनानंतर  अळगिरी यांनी मरीना बीचवर जाऊन करुणानिधींच्या समाधीचे दर्शन घेतले. ‘ द्रमुकच्या बहुतांश कार्यकर्त्यांचा मला पाठिंबा आहे. करुणानिधींचा खरा  राजकीय वारसदार मीच आहे. स्टॅलिनला पक्षाध्यक्ष होण्याचा कोणताही अधिकार नाही, असे  अळगिरी यांनी म्हटले आहे.