पक्षाचा जोर वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार- शरद पवार

0
483

मुंबई, दि.११ (पीसीबी) – केवळ ग्रामीण चेहऱ्याचा पक्ष ही राष्ट्रवादीची ओळख बदलून, शहरी भागातही पक्षाचा जोर वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत. नागरिकांना बदल हवा असतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. आपल्या पक्षसंघटनेच्या कामकाजाची पद्धत बदलून सोशल मीडियातील प्रचार व लोकसंवादाकडे जादा लक्ष द्या, असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

‘राष्ट्रवादीचा चेहरा हा ग्रामीण आहे. पण ५० टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे. आता तालुक्यातालुक्यात नागरीकरण झाले आहे. मुंबईत आपण कमी पडतो. हे मान्य करा. आजच्या दिवशी राष्ट्रवादीची शहरी भागात व्याप्ती वाढविण्याचा निर्धार करू या. मुंबईत सर्व राज्यांच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व असून, मुंबईकरांनी ते आनंदाने स्वीकारले आहे. तेलुगू समाजाचे मुंबईत मोठे योगदान असून, राष्ट्रवादीत सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू,’ असे पवार म्हणाले. नवी तरुण पिढी आपल्या पक्षात तयार झाली पाहिजे. नागरिकांना बदल हवा

असतो, असे नमूद करत पक्षात बदलाचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीत सडकून टीका करतानाच, देशात साप्रदायिक विचार फैलावण्याचा उद्योग सत्ताधारी करीत असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली. ‘आपल्या देशाचा पंतप्रधान गुहेत जाऊन बसला. तेही भगवे वस्त्र पाघरून. यातून तुम्ही जगाला काय संदेश देणार आहात. तरुणांना विज्ञानाची कास धरून आधुनिकीकरणाकडे नेले पाहिजे. ते करायचे सोडून पंतप्रधान गुहेत जाऊन बसतो, अशी टीका त्यांनी केली. यावेळी संसदेत भगवे विचार मांडणाऱ्यांची संख्या जास्त असेल. त्यात गंभीर स्वरूपाचे खटले असणारे लोक जास्त आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीला तिकीट देणे ही लोकशाहीत गंभीर बाब आहे’, असेही ते म्हणाले.

मराठवाड्यात बिअर कंपन्यांना पाणी द्यायला सरकारला जमते, पण मराठवाड्यातील तहानलेल्या नागरिकांना पाणी देता येत नाही, अशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली, तर लोकसभेची चर्चा पुरे करा. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या. केवळ ‘ईव्हीएम’ला दोष देत

आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

दुष्काळग्रस्तांना 

मदतीचे आवाहन 

‘आजचा वर्धापन दिन राष्ट्रवादी जलदिन संकल्प म्हणून साजरा करत आहे. भयानक दुष्काळात अडकलेल्या नागरिकांना शक्य ती मदत करावी. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन सकारात्मक कामे करावीत, असे आवाहन पवार यांनी केले.