पंधरा लाखांचे कर्ज फेडण्यासाठी रिक्षा चालकाने पत्नी आणि मुलीला काढले विकायला

0
487

आंध्रप्रदेश, दि. २८ (पीसीबी) – आंध्रप्रदेशात एका रिक्षा चालकाने १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी चक्क पत्नी आणि पोटच्या मुलीला विकायला काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीच्या विक्रीसाठी आरोपी रिक्षा चालकाने एका बाँडवर देखील स्वाक्षरी केली होती.

मुलीने तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तिला खरेदीदारांच्या ताब्यात सोपवण्याचा त्याने करार केला होता. सध्या ही मुलगी १२ वर्षांची आहे. दीड लाखामध्ये त्याने हा सौदा ठरवला होता. मुलगी वयात येईपर्यंत तिच्यावर कोणाची नजर पडणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची अट खरेदीदाराने घातली होती असे आरोपीच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

आरोपी रिक्षा चालक मद्यपी असून तो पत्नीला सुद्धा त्याच्याच चुलत भावाला पाच लाख रुपयांना विकणार होता. त्यासाठी तो तिच्यावर बाँड साईन करायची जबरदस्ती करत होता. पतीच्या या वागण्याने हादरून गेलेली महिला मुलांना घेऊन नानद्याल येथे आई-वडिलांच्या घरी निघून आली त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही महिला मुलांना तिच्या आई-वडिलांच्या घरी घेऊन आली पण नवरा तिथेही पोहोचला आणि त्याने त्रास देणे चालूच ठेवले असे महिलेने सांगितले. याप्रकरणात तपास केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.