Pimpri

पंधरा दिवसांनंतर 100 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार – आयुक्तांची माहिती

By PCB Author

May 28, 2022

पिंपरी दि. २८ (पीसीबी) – आंद्रा धरण योजनेतील इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यासाठी निघोजे, तळवडे येथील अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे, विद्युत पुरवठ्याचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर चिखली केंद्रास 100 एमएलडी पाणी उपलब्ध होणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

चिखली केंद्रास 100 एमएलडी पाणी मिळणार असे, वर्षभरापासून सांगितले जात आहे. त्यासाठी प्रशासन व पदाधिका-यांनी वेगवेगळ्या तारख्या घोषित केल्या. मात्र, प्रत्यक्षात अद्याप शहराला पाणी मिळलेले नाही. या संदर्भात आयुक्तांना विचारले असते ते बोलत होते. चिखली परिसरातील भागास वाढीव पाण्यातून पुरवठा केला जाईल. निगडी केंद्रांतून तेथे पुरविले जाणारे पाणी इतर भागात वळविले जाईल. त्यामुळे पावसाळ्यात शहराला अतिरिक्त पाणी मिळू शकणार आहे.

आयुक्त पाटील म्हणाले की, निघोजे अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दोन्ही केंद्रांना वीजपुरवठ्यासाठी भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वीजजोड घेतला जाणार आहे. चिखली केंद्रास पाणी उपलब्ध झाल्यानंतर तांत्रिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ते शुद्धीकरण प्रक्रिया नियमितपणे सुरू झाल्यानंतर चिखली परिसरातील भागात ते पाणी पुरविले जाणार आहेत. त्यानंतर निगडी सेक्टर क्रमांक 23 येथून त्या भागास दिले जाणारे पाणी शहरातील इतर परिसरात वळविले जाणार आहे. त्यामुळे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.