पंतला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवा- लक्ष्मण

0
444

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – ‘ऋषभ पंत हा आक्रमक खेळणारा फलंदाज आहे. पण, चौथ्या स्थानावर नेमकी कशी फलंदाजी करायची असते याचा अंदाज त्याला नाही. त्यामुळे त्याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवायला हवे,’ असे मत माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने व्यक्त केले आहे.

पंतची कामगिरी सध्या चिंतेचा विषय झाली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील पंतच्या कामगिरीवर नाराज आहेत. अशातच फलंदाजीतील त्याच्या क्रमाची चर्चा ऐरणीवर आली आहे. लक्ष्मणनं यावर मार्ग सुचवला आहे. ‘ऋषभ हा आक्रमक प्रवृत्तीचा खेळाडू आहे. मात्र, चौथ्या क्रमांकावर तो यशस्वी होताना दिसत नाहीये. या क्रमांकावर नेमके कोणत्या पद्धतीने खेळायचे असते याची जाण अद्याप त्याला नाही. त्यामुळे त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर पाठवायला हवे. तिथे नैसर्गिक खेळ करून स्वत:ला सिद्ध करायची त्याला संधी मिळेल,’ असे लक्ष्मणने म्हटले आहे.