Banner News

पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या; पिंपरी महापालिकेच्या महासभेत ठराव

By PCB Author

August 24, 2019

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ ‘अ’ हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पंतप्रधान मोदी यांना भारतरत्न देण्याचा ठराव पिंपरी महापालिकेच्या महासभेत नुकताच करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

या सभेच्या सुरूवातीला भाजप नगरसेवक नामदेव ढाके यांनी पंतप्रधान मोदी यांनी भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास संतोष लांडे, माऊली थोरात, केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले.

या ठरावावर भाषण करताना नामदेव ढाके म्हणाले की, काश्मीरमधील ३७० कलम हटवून मोदी सरकारने इतिहास घडवला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. या क्रांतिकारक निर्णयाबद्दल मोदींना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे.

स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या की, भारतीय जनतेने ज्या विश्वासाने मोदी यांच्यावर विश्वास दाखवून सत्ता दिली. त्या जनतेचे अभिनंदन केले पाहिजे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून देशासाठी हितकारक निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना न्याय मिळाला आहे. तीन तलाक विरोधी कायदा केल्याबद्दलही मोदी सरकारचे अभिनंदन. लोकशाही मानणारे नागरिक या निर्णयांचे स्वागत करत आहेत. ज्यांनी चांगले काम केले, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना भारतरत्न देण्यात यावा.

आशा शेंडगे- धायगुडे म्हणाल्या की, काश्मीर म्हणजे भारताची आन-बाण-शान आहे. काश्मीरमध्येही एकच ध्वज असावा, अशी सर्वांची भावना होती. कलम ३७० हटवून देशहितासाठी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे अभिनंदन.

विधी समितीच्या अध्यक्षा अश्विनी बोबडे म्हणाल्या की, काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे नांव सुवर्णाक्षरात लिहिले पाहिजे. मोदींचा हा निर्णय कल्याणकारी आहे.