पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी; निवडणूक निरीक्षक अधिकारी निलंबित

0
522

भुवनेश्वर, दि. १८ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी) सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या विमान अथवा हेलिकॉप्टरची तपासणी करू नये, असा स्पष्ट नियम केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिला आहे. तरीही निवडणूक प्रचार सभेसाठी ओडिशातील संबळपूरमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक निरीक्षक मोहम्मद मोहसीन यांनी तपासणी केली होती.

अचानक घडलेल्या या तपासणीमुळे पंतप्रधानांचा जवळपास १५ मिनिटे खोळंबा झाला होता. यानंतर जिल्हाधिकारी व पोलिस महासंचालकांनी याबाबतचा अहवाल आयोगाला सादर केला होता. त्यानुसार कर्नाटक केडरचे सन १९९६च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मोहसीन यांना आयोगाने निलंबित केले. यापूर्वी मंगळवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक अधिकाऱ्यांनी रुरकेला येथे तर, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची संबळपूरमध्येच अचानक तपासणी करण्यात आली होती.