पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानलेल्या करिमा यांचा संशयास्पद मृत्यू

0
304

कॅनडा, दि.२६ (पीसीबी) : पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या हुकूमशाहीविरोधात आवाज उठवत कित्येक वर्षांपासून बलूच आंदोलनाला बळकटी देण्यासाठी झटणाऱ्या करिमा बलोच यांचा कॅनडातील टोरंटो इथं संशयास्पद मृत्यू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रविवारपासूनच त्या बेपत्ता होत्या. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत याबाबातची रितसर तक्रारही दाखल केली होती.

टोरंटोच्या बाहेर असणाऱ्या एका लहानशा बेटापाशी त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याचं म्हटलं गेलं. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं. कॅनडामध्ये पाकिस्तानमधील निवृत्त सैन्य अधिकारी शरण जात आहेत. हे अधिकारी अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या संपर्कात असून त्यांच्यामुळं आपल्या जीवाला धोका असल्याची बाब त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. पाकिस्तानातही त्यांना अशाच प्रकारच्या आव्हानांचा आणि आत्मघातकी हल्ल्यांचा सामना करावा लागला होता.

सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी कार्यकर्त्या म्हणून ओळख
करिमा पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मनमानीविरोधात व्यापक आंदोलन करत होत्या. बलूच आंदोलनाशी संलग्न महिला आंदोलकांमधील सर्वाधिक प्रभावी आंदोलक म्हणून करिमा गणल्या जात होत्या. 2016 मध्ये बीबीसीनं जगभरातील 100 प्रभावी आणि शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला होता. 2016 याच वर्षात त्यांनी पाकिस्तानमधून पळ काढत कॅनडामध्ये शरणागती घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाऊ मानत होत्या बलोच…
पाकिस्तानी सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये होणाऱे अत्याचार त्या सातत्यानं जगासमोर आणत होत्या. अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला होता. 2016 मध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं बलोच स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी असणाऱ्या करिमा यांनी काही वर्षांपूर्वी (Narendra Modi) पंतप्रधान मोदींना आपला भाऊ म्हणून संबोधत त्यांच्याकडे मदतीची साद घातली होती. हजारोंच्या संख्येनं बलुचिस्तानमधील बहिणींचे भाऊ बेपत्ता आहेत, त्यांच्या बहिणी कुटुंबीय त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. यापैकी कित्येकजण तर कधीही परतणार नाही हेसुद्धा एक दाहक वास्तव आहे. तर, आपण हा मुद्दा आणि बलुचिस्तामध्ये होणाऱ्य मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात बलूच समुदायाच्या वतीनं मांडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

करिमा यांच्या निधनाचं वृत्त कळताच जगभरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. मुख्य म्हणजे यामध्येच पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआसकडून बाहेरी राष्ट्रांमध्येही कशा प्रकारे बलूच आंदोलकांच्या जीवाला धोका आहे ही बाब अधोरेखित केली जात आहे.