Desh

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती ३६ लाखांनी वाढली

By PCB Author

October 15, 2020

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती हा देशातील नागरिकांसाठी आकर्षनाचा विषय. पाच वर्षांत शेकडो कोटींची माया जमविणारे असंख्य पुढारी जनतेच्या डोळ्यावर येतात. पंतप्रधान मोदी यांचे कुटुंब आहे, पण प्रपंच नसल्याने त्यांची संपत्ती किती याची उत्कंठा अनेकांना असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत घट झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे नव्याने दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही बाब समोर आली आहे.

पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती २.४९ कोटी रुपये होती. त्यांच्या बँक खात्यात ३.३ लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची ३३ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे. दरम्यान, जून महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींकडे ३१,४५० रुपये रोख रक्कम होती. तर गांधीनगरच्या एसबीआय बँकेच्या खात्यात २,३८,१७३ रुपये रक्कम होती. त्याचबरोबर याच शाखेत मोदींची एफडी असून विविध प्रकारे जमा झालेली रक्कम १,६०,२८,९३९ इतकी होती. त्याचबरोबर पंतप्रधानांकडे ८,४३,१२४ रुपयांची राष्ट्रीय बचत पत्रे (एनएससी), १,५०,९५७ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज आणि २०,००० रुपयांचे करबचतीचे इन्फ्रा बॉण्ड्सही आहेत. तर १.७५ कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती आहे.