पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लडाख दौऱ्यावर

0
269

 

श्रीनगर, दि. ३ (पीसीबी) : चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले आहेत. चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल झाले. यावेळी ते गलवान येथे जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावत हे देखील लेह दौऱ्यावर आहेत.

LAc वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचल्याने, भारताची आक्रमक भूमिका यावरुन दिसून येत आहे. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष वाढला आहे. LAC वरील सैन्य माघारीदरम्यान, विश्वासघाती चीनने 15 आणि 16 जूनच्या रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे भारतात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने चीनसोबत आर्थिक व्यवहार हळूहळू कमी करण्याची करुन नाकेबंदी करण्याची तयारी केली आहे. त्याआधी भारताने चीनचे 59 अॅप्स बंद करुन झटका दिला आहे.

शुक्रवारी सीडीएस बिपीन रावत यांची उत्तर कमांड आणि 14 कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार होती. चीनसोबत सीमेवर असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा आढावा यामध्ये घेतला जाणार होता. तत्पूर्वी, लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हे लेहला गेले होते. तिथे त्यांनी गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत जखमी जवानांची भेट घेतली.त्याशिवाय लष्कर प्रमुखांनी पूर्व लडाखच्या फॉरवर्ड पोस्टला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तुमचे काम उत्कृष्ट झाले आहे, परंतु हे काम अजून पूर्ण झालेले नाही, अशा शब्दात लष्कर प्रमुखांनी जवानांचा उत्साह वाढवला होता.

पंतप्रधान आर्मी अभियांत्रिकी रेजिमेंट निमू आणि थिकसे रणबीरपूर पॅराड्रॉपिंग ग्राऊंडला भेट देत आहेत. निमू येथे पंतप्रधानांनी ब्रीज निर्मितीच्या कामाचे उद्घाटन केले, तर स्टाकना येथे ते भारतीय वायुसेना आणि लष्कराच्या दुसर्‍या संयुक्त कार्यक्रमाला उपस्थित राहतील.