पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मान आहे; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

0
347

महाराष्ट्र,दि.१५(पीसीबी) – भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. आता भाजपाच्या माजी आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मान आहे,” असे मत भाजपाचे माजी आमदार सुरेश हळवणकर केलं आहे.

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकासंदर्भातील वादावर प्रितिक्रिया देताना भाजपाचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी शिवाजी महाराजांची तुलना करणे चुकीचे नाही. या पुस्तकाचे लेखकाचे मी समर्थन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराजांच्या तुलनेत गैर काहीच नाही. ही तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे,” असं मत हळवणकर यांनी भाजपाच्या बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या कामामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम यामध्ये साधर्म्य असल्याचा दावाही हळवणकरांनी केला आहे. या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी हळवणकरांनी मोदींनी सुरु केलेल्या काही योजनांचा संदर्भ दिला. हळवणकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.