Desh

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांना ई-मेल

By PCB Author

October 13, 2018

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींना धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना अज्ञाताने पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात माहिती दिली. नोव्हेंबर २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांना ठार करु, असे ईमेलमध्ये म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींना धमकी देणारा ईमेल केवळ एका ओळीचा असून, त्यासंदर्भात तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, धमकीचा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ईमेल नेमका कुणी पाठवला आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीच ठोस माहिती समोर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणांनीही तपासाला सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी खास पथके तयार करुन, पंतप्रधान मोदींना धमकी देणारा ईमेल पाठवणाऱ्याचा तपास सुरु केला. ईशान्य भारतातून धमकीचा ईमेल आल्याचा अंदाज असल्याने, पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली. पोलिस तपास करत आहेत.