पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींनी केले औरंगाबादमधील मोर्चाचे नेतृत्व   

0
555

औरंगाबाद, दि. ४ (पीसीबी) –  महाराष्ट्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) निर्णयाच्या निषेधार्थ आणि रोख सबसिडी नको, धान्य हवे यासह इतर मागण्यांसाठी आज ( मंगळवारी) औरंगाबाद जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा  काढण्यात आला.   

प्रल्हाद मोदी या मोर्चात सामील होण्यासाठी  सोमवारी (दि.३) औरंगाबाद शहरात दाखल झाले होते. खुल्ताबाद तालुक्‍यातील कसाबखेडा येथील एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वेरूळच्या आश्रमात जाऊन शांतीगिरी महाराजांची भेट घेतली होती.

आज दुपारी बारा वाजता क्रांतीचौक येथून स्वस्त धान्य दुकानदारांच्या मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी प्रल्हाद मोदी यांच्यासह फेडरेशनचे देशभरातील पदाधिकारी  या मोर्चात सहभागी झाले होते.