पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’!, राज ठाकरेंची मोदींवर टीका

0
453

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  पाच वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरे न गेलेल्या पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत भाजपची पत्रकार ही परिषद झाली. पंतप्रधान मोदींच्या या अभूतपूर्व पत्रकार परिषदेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे.  पंतप्रधानांची पत्रकार परिषद… ‘मौन की बात’!, असे ट्विट करत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.

यापूर्वीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले होते. तर मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राज्यात दहा प्रचार सभा घेतल्या.

दरम्यान पाच वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरे न गेलेल्या पंतप्रधान मोदींनी शक्रवारी पहिल्यांदाच  पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार याबाबत माहितीही दिली. मात्र त्यानंतर पत्रकारांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला असता “अध्यक्षजी जवाब देंगे” असे म्हणत मोदींनी उत्तर देण्याचे टाळले.