पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही; मला माझ्या योग्यतेपेक्षा अधिक मिळाले- गडकरी

0
407

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – ‘राजकीय आयुष्यात मला माझ्या योग्यतेपेक्षा खूप अधिक मिळाले. त्यामुळे मी कोणत्याही शर्यतीत नाही. पंतप्रधानपदाच्याही नाही,’ असे केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
मोदी सरकारला चार वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळाल्यास सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिले जात असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना गडकरी यांनी कुठल्याही शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. ‘मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. मंत्री म्हणून मी खूप समाधानी आहे. मला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा नाही,’ असे त्यांनी सांगितले. ‘पुढील निवडणुकीत भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.