पंतची आक्रमक खेळी; विहारी, अश्विनने ऑस्ट्रेलियाला रडवले

0
220

विजयासाठी ४०७ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट पंडितांनी भारताचा पराभव लिहायला सुरवात केली होती. अंदाजही तसेच वर्तवले जात होते. पण, सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी जिगर दाखवली. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि विजय नाही, पण मानसिकदृष्ट्या त्यांनी ऑस्ट्रेलियाला रडवले, थकवले. काही म्हटले तरी चालेल. कारण भारतीयांची कामगिरीच तशी केली. भारताने १३१ षटकांत ५ बाद ३३४ धावा केल्या.

अखेरच्या दिवसाला सुरवात झाल्यावर अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला. लायनने त्याला शॉर्टलेगवर लाबुशेनकरवी झेलबाद केले. त्या वेळी सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पहिल्या डावात जखमी झालेला रिषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. पण, भारताची हीच खेळी निर्णायक ठरली. उजव्या डाव्या जोडीच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना लय मिळवणे कठिण गेले आणि त्याचा फायदा पंतने उठवताना आपल्या नैसर्गिक फलंदाजीने ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्यास सुरवात केली. लायनचा त्याने यथेच्छ समाचार घेतला. ही जोडी खेळपट्टीवर असताना ऑस्ट्रेलियाची चिंता वाढायला लागली होती. निराशा म्हणजे काय असते हे तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कळत होते.

उपाहारानंतर पंत शतकाच्या उंबरठ्यावर होता. इतका वेळ खेळल्यानंतर त्याला तीन धावा काही दूर नव्हत्या. पण, नशिबाने त्याला त्या तीन धावांपासून दूरच ठेवले. त्याने ११८ चेंडूत ९७ धावा करताना पुजाराच्या साथीत चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर पुजाराने काही वेळ फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेतली. पण, तो देखिल बाद झाला. ही जोडी विशेषतः पंत खेळपट्टीवर असताना मनाच्या एका कोपऱ्यात विजयाची चाहूल लागून राहिली होती. पण, दोघेही बाद झाल्यावर पुन्हा एकदा पराभव दिसू लागला.

त्या वेळी एकत्र आलेल्या हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तग धरण्यास सुरवात केली. खेळपट्टीवर उभे राहून फक्त चेंडू तटवण्याला सुद्धा जिगर लागते. ती जिगर विहारीने दाखवली. पायाचा स्नायु दुखावल्यानंतरही वेदना विसरून तो संघासाठी खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला. अश्विनने हळुहळू धावा करण्यास सुरवात केली. ही जोडी देखिल जम धरू लागल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाचा संयम सुटू लागला. गोलंदाजांचे चेंडू अंगावर येऊ लागले, क्षेत्ररक्षकांमधील आक्रमकता वाढू लागली, अपिल झाली पण, याचा काही एक परिणाम या जोडीवर झाला नाही. उलट या नादात ऑस्ट्रेलियाकडून अनेक झेल सुटले आणि भारतीय जिगरबाज खेळीला नशिबाची अशी साथ मिळाली. तब्बल साडे तीन तास खेळपट्टीवर विहारी फेव्हिकॉल लावल्यासारखा चिकटून राहिला. आपल्या चिवट फलंदाजीने त्यांनी ४२.४ षटके खेळून काढताना ६२ धावांची भागीदारी तर केलीच, बरोबरच चिवटपणाची प्रेरणा देणाऱ्या राहुल द्रविडचा ४८वा वाढदिवसही साजरा केला.

या जिगरबाज ड्रॉ नंतर आता चौथा निर्णायक कसोटी सामना ब्रिस्बेनला १५ तारखेपासून सुरू होईल.