पंढरपूर-माळशिरसमध्ये संथ गतीने मतदान

0
495

पंढरपूर, दि. २१ (पीसीबी) पंढरपूर विधानसभा मतदारसंघात संथ गतीने मतदानाला सुरवात झाली आहे. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात भाजपा उमेदवार सुधाकरपंत परिचारक ,राष्ट्रवादीचे भारत भालके यांनी मतदान केले. दरम्यान, पावसाने उसंत घेतल्याने आता येरे येरे पावसा ऐवजी आता येरे येरे मतदार राजा अशी हाक राजकीय कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी शांततेत सुरवात झाली. काल रात्री पडलेल्या पावसाने पहाटे पासून उसंत घेतली आहे. सकाळी १० नंतर कडक उन्ह पडले. त्यामुळे पहिल्या सत्रात मतदान जरी संथ असले तरी पुढे टक्केवारीत वाढ होईल असा अंदाज आहे. येथील भाजपा उमेदवार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादीचे भारत भालके यांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील मदान केंद्रावर पुरेसा पोळी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. माळशिरस तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर दुसरीकडे सांगोल्यात शेकपाचे जेष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांनी सपत्नीक मतदान केले. तर येथील शेकापाचे उमेदवार डॉ अनिकेत देशमुख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. एकंदरीत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान जरी संथ असले तरी टक्केवारीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सकाळचं पहिल्या सत्रात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.