पंढरपूरात आंदोलन करून लाखो वारकऱ्यांची गैरसोय करू नका ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0
606

नागपूर, दि. २० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार  सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा सामाज मोर्चाने पंढरपूर येथे आंदोलन करून  लाखो वारकऱ्यांची गैरसोय करू नये. हे आंदोलन केल्यास लाखो वारकऱ्यांविरुद्धचे ते आंदोलन ठरेल, म्हणून  आंदोलन करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) केले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागास वर्ग आयोगाच्या अहवालानंतर आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. न्यायालयात पूर्ण तयारीनिशी बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करु. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे.  तो अहवाल आल्यानंतर केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असे  फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

राज्य सरकारच्या वतीने ७२ हजार पदांची महाभरती केली  जाणार आहे. त्यामध्ये १६ टक्के जागा  मराठा आरक्षण मिळेपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहेत. आरक्षणाबाबत निर्णय झाल्यानंतर ही पदे भरली जाणार आहेत, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

मराठा समाजातील तरूणांसाठी शुल्क सवलत, उत्पन्न मर्यादा, वसतिगृहांची सोय असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. उच्च शिक्षणामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क सवलत दिली आहे. या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असेही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.