पंढरपुरात २४ डिसेंबरला शिवसेनेची जाहीर सभा; उध्दव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

0
746

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना आता  २४ डिसेंबर रोजी  पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. तसेच पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन दुष्काळाबाबत सरकारने विविध उपायोजना करावी आणि अयोध्येत राममंदिर बांधण्याची सुबुध्दी सरकारला द्या, असे साकडे घालणार आहेत. तसेच मुंबई ते पंढरपूर या मार्गावर धावणाऱ्या ‘विठाई’या नव्या एसटी सेवेचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या सभेसाठी अनेक वारकरी संघटनांनी स्वत:हून सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. संघटना आणि पक्ष म्हणून आपण दुष्काळग्रस्तांना मदत करतच आहोत. तरीही आपण दुष्काळप्रश्नी सरकारला जागे केले पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान बैठकीत मंत्र्यांवर सभा यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. राम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार आहे. राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे त्यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत  जाहीर केले.