पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही

0
399

नाशिक, दि. २० (पीसीबी) – ‘मराठा क्रांती मोर्चातर्फे काढण्यात आलेले लाखोंचे मोर्चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दुर्लक्षित केले असून, दोन दिवसात मराठ्यांच्या मागण्यांबाबत काही लेखी निर्णय न घेतल्यास पंढरपुरात आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करू दिली जाणार नाही,’ अशी भूमिका सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे घेण्यात आली आहे. अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा काही अधिकार नसून, त्यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. पंढरपूरसाठी नाशिकमधून अनेक तरुण रवाना होणार असून, मुख्यमंत्र्यांना महापूजा करू न देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

मराठा मोर्चाविषयी विधीमंडळ अधिवेशनात कुणीही आमदार चकार शब्द काढत नाही त्यामुळे सर्व आमदारांचा निषेध करीत असून, यापुढे आमदारांना गावबंदी करणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या महाआरतीचा मान मुख्यमंत्र्यांना देण्यात येतो. परंतु, यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना ही पूजा करू दिली जाणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चातर्फे घेण्यात आली आहे. मराठा समाजाचे अनेक मुलभूत प्रश्न आहेत ते सुटावेत यासाठी काढण्यात आलेले ५८ मूक मोर्चे सरकारने दुर्लक्षित केले. मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा त्यात होता; मात्र मुख्यमंत्र्यांनी १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. ते आम्हाला नको आहे, अशी भूमिकाही यावेळी घेण्यात आली.