पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत – चंद्रकांत पाटील

0
362

मुंबई,दि.२(पीसीबी) – परळी मतदारसंघातून झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपासंदर्भातली ओळखही काढून टाकली. त्यामुळे पंकजा भाजपाला रामराम करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.

अखेरीस भाजपाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर प्रतिक्रीया दिली आहे. “पंकजा मुंडे या भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात”, चंद्रकांत पाटील यांनी भाजपाची बाजू मांडली.

कोणताही राजकीय नेता असो पराभवानंतर तो आपल्या पराभवाचं विश्लेषण करत असतो. असं का झालं याबद्दल तो आत्मचिंतन करत असतो. १२ तारखेला गोपीनाथ गडावर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यासाठी राज्यभरातील त्यांचे अनेक नेते गोपीनाथगडावर येतात. आम्हीही या कार्यक्रमाला जातो. त्यामुळे पंकजा वेगळा विचार करत आहेत असा अर्थ काढणं चुकीचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.